लोकलमधील गर्दीमुळं महिलांनी नोकऱ्या सोडल्या!

ठाणे: ठाण्यातील मुकुल मुजुमदार अंधेरीमध्ये ट्रॅव्हल कन्सल्टंट म्हणून कार्यरत होत्या. परंतु गेल्या सहा महिन्यांतील लोकलची गर्दी आणि पावसाळयातघाटकोपरस्थानकात अडकून पडण्याच्या घटनेमुळे झालेल्या प्रचंड त्रासामुळे मुजुमदार यांनी नोकरी सोडली. लोकलची गर्दी असह्य झाल्याने कल्याणच्या संध्या तावडे यांनीही निवृत्तीला सहा महिने असताना सेवा निवृत्ती घेऊन हा मनस्ताप संपवला. मध्य रेल्वेच्या लोकलमधील वाढती गर्दी गाडीत चढण्यासाठीचा संघर्ष लोकल प्रवासातून उद्भवणारे वाद प्रवासदरम्यान रोजच घडणारे अपघात यामुळे ठाणे- कल्याणमधील अनेक महिला प्रवाशांनी नोकरी सोडण्याच्या टोकाचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. डोंबिवलीच्या चार्मी पासडच्या मृत्यूच्या घटनेनंतर चार्मीप्रमाणे इतर मुलींवर अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रवासी आणि प्रशासनानेही पुढाकार घेऊन रांगांमधून लोकल प्रवेशाचा मार्ग अवलंबण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.