उल्हासनगर- उल्हासनगर शहरातील विविध भागांत रस्त्याच्या दुतर्फा होणारे बेकायदा पार्किंग आणि त्यामुळे शहरभर उद्भवणारी वाहतूककोंडी थांबावी, यासाठी महापालिकेने नुकतीच ठिकाणी अधिकृत पार्किंग सुरू केले, मात्र उल्हासनगर रेल्वे स्थानकाच्या बाहेरील भागात स्थानिक पार्किंग माफियांकडून रहदारीच्या रस्त्यावर आणि महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर बेकायदा वाहनतळ सुरू आहे. महापालिकेचा वाहन विभाग आणि शहरातील वाहतूक पोलिस रस्ते अडवणाऱ्या पार्किंगवर कारवाई करण्यात टाळाटाळ करत आहेत. उल्हासनगर शहरातील पार्किंगची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शहरात मिळेल त्या भागात बेशिस्तपणे वाहनचालक आपापली वाहने पार्क करत असल्याने वाहतूककोंडीची समस्या उद्भवत आहे. त्यात अनेक ठिकाणी बेकायदा पार्किंगसाठीही वाहनचालकांकडून पैसे वसूल केले जातात. यावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने शहरातील साधारण पाच भागात पार्किंगसाठी निविदा प्रक्रिया राबवली. यातील तीन ठिकाणे वादग्रस्त ठरल्याने, दोन निविदांना प्रतिसाद मिळाला होता. उल्हासनगर रेल्वे स्थानकाच्या पश्चिम भागात आणि शहाड रेल्वे स्थानकाच्या बाहेर अधिकृत पार्किंग सुरू करण्यात आली आहे. अधिकृतरित्या पार्किंगचालकांकडून वाहने सुरक्षित राहवीत यासाठी प्रत्येक वाहनचालकाला महापालिकेची अधिकृत पावती दिली जाते. संपूर्ण भूखंडाला सुरक्षा जाळी बसवण्यात आली असून वाहनांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही लावत सुरक्षारक्षकही नेमले आहेत. पालिकेच्या पार्किंगमध्ये वाहनचालकांकडून प्रतिवाहन २० रुपये आकारले जात आहेत. मात्र याच वाहनतळाच्या भूखंडासमोरील रहदारीच्या रस्त्याला लागून आणि पालिकेच्या आरक्षित भूखंडावरही पूर्वीचे बेकायदा वाहनतळ सुरू आहे. त्यात बेकायदा पार्किंगचालक वाहनचालकांकडून प्रतिवाहन १५ रुपये वसुली करतो. येथे रोज जवळपास ३०० वाहने उभी राहतेमहापालिकेच्या अधिकृत वाहनतळापेक्षा बेकायदा ठिकाणी वाहने उभी करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. हा सर्व प्रकार सुरू असताना, महापालिकेतील वाहन विभाग आणि शहरातील वाहतूक विभाग या बेकायदा वाहनतळावर कारवाई करताना दिसत नाही. त्यामुळे महापालिकेच्या अधिकृत पार्किंगच्या निविदांना पार्किंग माफियांच्या दादागिरीमुळे प्रतिसाद मिळत नसल्याने महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असल्याचे बोलले जात आहे तसेच याच महापालिकेच्या संबंधित विभागातील अधिकाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध गुंतल्याने, शहरातील बेकायदा पार्किंगवर कारवाई होताना दिसत नसल्याचे बोलले जात आहे
उल्हासनगरमध्ये पार्किगमाफियांकडून बेकायदा वसुली